प्रचंड क्षमतेचे कार्यकर्ते घडविणारा माणूस - मदनदास देवी.
मदनजींचा आज अमृत महोत्सव आहे... मदनदास देवी... अत्यंत संवेदनशील, मृदू तरीही स्वत:प्रती कठोर असलेले मदनजींसारखे असंख्य कार्यकर्ते हे संघ परिवाराचे वैशिष्ट्य आहे. मदनजींच्या आग्रहामुळे त्यांच्या अमृत महोत्सवाचा जाहिर कार्यक्रम तर होणार नाहीये. परंतु यानिमित्ताने मदनजींच्या कार्याची नोंद समाजासमोर ठेवणे आम्हाला आवश्यक वाटल्याने दै.तरूण भारततर्फे आम्ही हा प्रपंच करीत आहोत. मदनजींचा त्यांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांवर आजही इतका वचक आहे की त्यांच्यावर खाजगी भेटीत भरभरून बोलणारे मोठमोठे कार्यकर्तेही, मदनजींना प्रसिद्धी आवडत नाही म्हणून, त्यांच्यावर लेख लिहायला तयार होत नाहीत. मदनजींसारख्या कार्यकर्त्याचे कार्य हे व्यक्तिगत कधीच नसते. त्यांच्या कार्याच्या नोंदीतून संघ परिवाराच्याच कामाची नोंद होणार असते, त्यात व्यक्तिगत उदोउदो नाही, हे कोणी लक्षात घेत नाही. तीन चार वर्षांपूर्वी नानाजी देशमुख यांच्यावर लिहायचे होते, तेव्हा हे प्रकर्षाने लक्षात आले की संघ परिवारातील कार्यकर्त्यांच्
या कामांची माहिती कुठल्याही प्रसिद्धी माध्यमानी नांदलेली नाहीच, पण संघ परिवार सातत्याने प्रसिद्धीपासून दूर राहिल्याने कार्याची नोद करण्याचे ऐतिहासिक महत्व कार्यकर्त्यांच्याहीलक्षात येत नाहीये. तुम्ही काहीही संशोधन करायला गेलात तर हाती येणारा मजकूर हा डाव्या संशोधकांनी व डाव्या पत्रकार लेखकांनी त्यंाच्या सोईने लिहिलेलाच हातात पडतो. ‘विवेक’च्या चरित्र कोशाचे काम करतानाही हेच लक्षात आले होते. हा देश डाव्यांनी घडवलेला नाही. प्रसिद्धीपासून दूर अनामिकराहून काम करणार्या, हिंदू संस्कृतीशी बांधिलकी मानणार्या असंख्य कार्यकर्त्यांनी हा देश घडवला आहे. डाव्यांनी समाजात निर्माण केलेल्या नकारात्मक मायाजालातून समाजाला अलगद बाहेर काढून विश्र्वगुरूपदाकडे या देशाची सुरू झालेली वाटचाल ही मदनजींसारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी घडवून आणली आहे. स्वत:चे आयुष्य देशासाठी देऊनही अनामिक राहणार्या या कार्यकर्त्यांचे कर्तृत्व समाजासमोर आले पाहिजे ते पुढील पिढीतील कार्यकर्त्यांना त्यातून शिकता यावे म्हणून. समाज संघटनेचे कार्य योग्य त्या अपेक्षित दिशेनेच चालू आहे, याची तपासणी करण्यासाठी काहीतरी मापदंड हवा, तो मदनजींसारख्यांच्या आयुष्याच्या आलेखातून मिळतो. म्हणून मदनजींसारख्यांचे कार्य हे लिखित स्वरूपात मांडले गेलेच पाहिजे. संघ परिवाराचा अभिनिवेश म्हणून नव्हे तर संघटित हिंदू समाजाचे आणि त्यातून विश्र्वगुरू भारताचे जे स्वप्न संघ परिवाराने पाहिले आहे ते प्रत्यक्षात आणताना सर्व विधिनिषेध बाळगून आणि संयमित पद्धतीने हे काम चालले आहे, त्याला हिंदू समाजाच्या इतिहासात भगिरथ प्रयत्नांचीच उपमा दिली पाहिजे.मदनजींचे कर्तृत्व फार मोठे आहेच. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याने देशाला दिलेले हे आणखी एक अनमोल रत्न आहे. या कार्यकर्त्यांनी देशाच्या घडणीत मोलाची कामगिरी बजावली आहे. इशान्य भारतातले प्रश्र्न लक्षात घेऊन तेथे आयुष्य वेचणार्या कार्यकर्त्यांची अभाविपची फळी उभी राहिली ती मदनजींच्याच कार्यकाळात. त्यात पद्मनाभजींसारखे आज राज्यपाल असणारे कार्यकर्ते जसे आहेत, तसेच अजूनही त्या भागात शाळा वा इतर सेवाकार्य चालविणारे कार्यकर्तेही आहेत. मदनजींनी घडवलेले असंख्य अभाविप कार्यकर्ते आज भाजपाच्या माध्यमातून केंद्रात व अनेक राज्यातून सत्तेत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस, शिक्षणमंत्री तावडे, चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान अशी कित्येक नावे घेता येतील जी मदनजींच्या संघटनमंत्रीपदाच्या कारकीर्दीत घडली. त्याचबरोबर राजकारणापासून दूर राहून कोकणातील ग्रामीण विकासाला वाहून घेतलेले डॉ. प्रसाद देवधर, नगर जिल्ह्यात वेश्यांच्या मुलांसाठी संगोपनगृह व वेश्यांच्या पुनर्वसनाचे कार्य चालविणारे ‘स्नेहालय’ डॉ. गिरीश कुलकर्णी या सेवा कार्यासोबतच जलवाहतुकीच्या क्षेत्रात स्वतंत्र सल्लागार म्हणून ठसा उमटविणारे आणि अजूनही इशान्य भारतासाठी सुरू असलेल्या ‘आंतरराज्य छात्र जीवनदर्शन’ प्रकल्पाची बांधिलकी जपणारे अतुल कुलकर्णी अशी अन्य अन्य क्षेत्रातील कित्येक नावे प्रत्येक राज्यातून घेता येतील. या व्यक्तींच्या जडण घडणीत आणि त्यांनी चालविलेल्या समाजकार्याच्या बांघिलकीत मदनजींचा प्रभाव मोठा आहे. अभाविपच्या इतिहासातील अतिशय महत्वाच्या काळात मदनजी राष्ट्रीय संघटनमंत्री राहीले. त्यांच्याच काळात ‘काश्मीर बचाव’आंदोलन विनोद तावडेंच्या नेतृत्वात अभाविपने चालविले. दहशतवादाने भीतीग्रस्त झालेल्या काश्मीरात देशभरातील दहा हजार विद्यार्थी 11 सप्टेंबर 1990 रोजी पोहोचले. हे आंदोलन सुरू असतानाच आंदोलकांना घेऊन येणारी एक एक्सप्रेस रेल्वे गाडी उडविण्यासाठी अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट केला. तरीही श्रीनगरमधील लाल चौकात अतिरेक्यांच्या नाकावर टिच्चून विनोद तावडे यांच्या नेतृत्वातील गटाने तिरंगा फडकविला. त्या सर्व आंदोलनाचे वैचारिक अधिष्ठान संघटनमंत्री म्हणून मदनजींचे होते. त्यापाठोपाठ रामजन्मभूमी आंदोलनातील अभाविपचा सक्रीय सहभाग न भुतो असा होता. 6 डिसेंबरला हिंदू समाजाने बाबरी ढांचा जमीनदोस्त केला. त्यानंतर ‘हे संघाचे काम नाही’ अशी जाहिर भूमिका रा.स्व. संघाने घेतली. त्यामुळे वैचारिक गोंधळात सापडलेल्या हिंदू समाजाला आणि विशेषत: युवा वर्गाला अभाविपने लगेच सुरू केलेल्या ‘राष्ट्रीय अस्मिता आंदोलना’ने ढळू पाहणारा आत्मविश्र्वास पुन्हा दिला. एका मोठा मानसिक आधार दिला. 12 जानेवारी 1993च्या विवेकानंद जयंतीपासून सुरू झालेल्या या आंदोलनाची घोषणा होती - ‘‘उधाणलेल्या जलधीसंगे यावा झंजावात । तशी देऊनी पराक्रमाला अभिमानाची साथ । परक्यांची या टाकू पुसूनी येथील नावनिशाणी ।।’’ या हिंदू समाजाच्या हृदयाला थेट हात घालणार्या भूमिकेला समाजातून उदंड प्रतिसाद लाभला. हिंदू अस्मिता पाय रोवून उभी राहिली.त्यापाठोपाठ लगेचच या धार्मिक आंदोलनातून अभाविपला बाहेर काढत देशातील विविध राज्यात शैक्षणिक प्रश्र्नावर मोठी आंदोलने उभारली गेली. हे संघटनात्मक कौशल्य, वेळेचे गणित साधत मदनजींच्या टीमने दाखवले. सर्व मोठ्या राज्यात मंत्रालयांवर प्रत्येकी लाखाचे मोर्चे काढण्यात आले. त्यातून शिक्षण क्षेत्राला नवा विचारही मिळाला तसेच राज्यांमध्ये नवीन युवा नेतृत्वही उदयाला आले. मदनजींचे हे संघटनात्मक कौशल्य अफाट आहे. याच काळातील एक सर्वात महत्वाचे आंदोलन होते ते मराठवाडा विद्यपीठ नामांतर आंदोलन. मराठवाडा विद्यपीठाच्या नामांतराला विरोध करीत काही राजकीय पक्षांनी राज्यभर दंगे माजविण्याची तयारी केली होती. त्याला तोंड देत हिंदू युवकांचे प्रत्यक्ष प्रबोधन करित नामविस्ताराचा तोडगा अभाविपने काढला. प्रत्येक महाविद्यालयातून सभा घेत युवकांची शक्ती या नामविस्ताराच्या मागे उभी केली. सरकारला निर्णय घेणे भाग पाडले. त्याच्याच काही काळ आधी देशभरात उठलेल्या मंडल आयोगविरोधी लढ्याला जातीय लढ्याचे स्वरूप येण्यापासून रोखले ते अभाविपने केलेल्या प्रबोधनानेच. आरक्षण प्रश्र्नावर दवळणेशभर युवकांच्या भावना समजून घेतानाच त्यांचे प्रबोधन करण्याचे व त्याला समरसतेचे वळण देण्याचे जे कौशल्य अभाविपने या काळात दाखविले त्याला तोड नाही. अभाविपचे कार्य विदेशातही रुजविण्याचा ‘‘वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंटस ऍण्ड युथ’’ या संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेला प्रयत्न मदनजींच्याच काळात अधिक जोरकस झाला. तंत्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचे उद्योजकांशी थेट संवाद व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळावा म्हणून सुरू झालेले ‘डिपेक्स’ ही याच काळातील. सध्या भाग्यनगर (हैद्राबाद) येथे असलेले प्रा.डॉ.जयंत कुलकर्णी म्हणतात की अभाविपच्या कामाला यशवंतरावांनी शैली दिली. बाळासाहेब आपटे यांनी बुध्दीचे तेज आणि तर्कशुध्दता दिली. सदाशिवराव देवधरांनी कार्यकर्ता व्यवहार शिकवला. तसेच मदनजींनी अभाविपच्या कामाला संवेदनशीलता दिली. कुलकर्णींचे म्हणणे अगदी सार्थ आहे. ‘डिक्की’या संस्थेचे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी अभाविप ज्या ठामपणे उभी राहिली ती संवेदनशीलता मदनजींनी दिली. आज पंढरीची वारी प्लास्टिकमुक्त व्हावी म्हणून गेली काही वर्षे वारी सोबत राहून वारकर्यांचे प्रबोधन करणारे प्रशांत अवचटसारखे कार्यकर्तेही मदनजींच्या काळातच घडले आहेत. मदनजींसारख्यांचे आयुष्य म्हणजे आंधळ्यांच्या गोष्टीतल्या हत्तीसारखे असते. ज्याच्या संपर्कात ते जितके आले तितकेच त्यांना माहित असते. मात्र आजच्यासारख्या निमित्ताने जेव्हा सगळ्यांचे अनुभव एकत्र होतात तेव्हाच कळते, की या माणसांचे काम प्रचंड आहे. अक्षरश: भारत घडविण्याचे काम त्यांनी केले आहे. मदनजींसारख्यांच्या कार्यावर खरेतर अभाविपनेच पुढाकार घेऊन पुस्तके प्रकाशित करायला हवीत. हे सांस्कृतिक संचित फार मोठे आहे. ते पुढील पिढ्यांच्या हाती योग्य रितीने सोपवले पाहिजे. मदनजींनीच आता या डॉक्युमेंटेशनच्या महत्वाच्या कार्याला प्रेरणा द्यायला हवी.
राजेश प्रभू साळगावकर
संपादक सोलापूर तरुण भारत
No comments:
Post a Comment