Thursday 13 October 2016

एक दोस्त ने किशोरदा के लिये लिखा

एक दोस्त ने किशोरदा के लिये लिखा



Image result for kishore kumar




कभी अलविदा ना कहना

१३ ऑक्टोबर १९८७. हा दिवस मला अजूनही लख्ख आठवतो. तो दूरदर्शनचा काळ होता. संध्याकाळच्या साडेसातच्या बातम्यांमधे किशोरकुमारच्या अकाली निधनाची बातमी दिली गेली आणि समस्त संगीतप्रेमी हादरले होते. मी धावत जाऊन मित्राला ही दुर्दैवी बातमी सांगितल्याचेही स्मरते. वय वर्षे ५८ हे काय जाण्याचे वय असते का? त्यातही तुम्ही तुमच्या क्षेत्रात अत्युच्च पदावर तळपत असताना? हिंदी सिनेसंगीतातला एक तारा अकाली निखळून पडला होता. पण सिनेरसिकांच्या हाती हळहळ व्यक्त करण्याशिवाय काही उरले नव्हते. नंतर रात्री दूरदर्शनवर श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात किशोरच्या आठवणी आणि गाणी यावर विस्तृत लेख आले. पण रसिकांनी एक हरहुन्नरी कलाकार गमावला होता आणि ही संपूर्ण सिनेसृष्टीची भरुन न निघणारी हानी होती.

खरंतर १३ ऑक्टोबर हा अशोककुमारचा जन्मदिवस. पण ८७ सालच्या त्या शोकाकुल वाढदिवसानंतर त्याने आयुष्यभर पुन्हा कधीच तो साजरा केला नाही. त्याचा लाडका किशोर त्यादिवशी त्याला सोडून निघून गेला होता. जो हात पकडून तो खांडव्याहून मुंबईला आला होता तोच हात सोडून तो त्याच्यापेक्षा १८ वर्षांनी मोठ्या असलेल्‍या भावाच्या आधी निघून गेला होता.

किशोर लहान असतानाच अशोककुमार मुंबईत आला. बॉम्बे टॉकीजमधे उमेदवारी करत त्याने नायक म्हणून आपले बस्तान बसवले. त्याच्यामागोमाग अनुपकुमार मुंबईत आला आणि सिनेसृष्टीत धडपड करायला लागला. किशोर मात्र आपल्याच मस्तीत खांडव्याला जगत होता. त्याला त्याच्या मोठ्या भावांच्या व्यवसायाचे अजिबात आकर्षण नव्हते. नाही म्हणायला किशोरला कुंदनलाल सैगलच्या गायकीचे जबरदस्त वेड होते. त्याची गाणी तो गुणगुणत असे. सैगलला  भेटता येईल म्हणून केवळ तो मुंबईला आला. इथे आल्यावर त्याला काहीच काम नव्हते. अशोककुमार नायक असलेल्‍या चित्रपटांच्या सेटवर तो टिवल्याबावल्या करीत फिरत असे. त्याकाळी अशोककुमार करत असलेल्‍या शामळू भूमिका बघून, "काय ह्या बायकी भूमिका करतोस, जरा मारामारी वगैरे करत जा" असा अनाहूत सल्ला किशोरने त्याला दिला होता. सेटवर तो इतरांच्या नकला करीत स्वतःची आणि इतरांची करमणूक करीत असे. सिनेमात काम करण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याची गाण्याची आवड पाहून संगीतकार सचिन देवबर्मन यांनी किशोरकुमारला १९४६ सालच्या त्यांच्या "शिकारी" या चित्रपटात कोरस मध्ये गायची संधी दिली. नंतर त्याच साली त्यांच्या "आठ दिन" या सिनेमात तो कोरसमधे होता.

चित्रपटात मुख्य गायक म्हणून गायची पहिली संधी किशोरला दिली ती संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी. १९४८ सालच्या बॉम्बे टॉकीजच्या "जिद्दी" साठी तो देव आनंदचा आवाज बनला. मरने की दुआए क्या मांगू, जीने की तमन्ना कौन करे हे त्याचे पहिलेच गाणे त्याने थेट सैगलच्या ढंगात गायले. दुर्दैवाने १९५० साली खेमचंद प्रकाशचे निधन झाले नाहीतर त्याने त्याला अजून काही गाणी नक्कीच दिली असती. अशोककुमारला किशोरने अभिनेता व्हावे असे वाटत असे मात्र किशोरला त्यात अजिबात स्वारस्य नव्हते. त्याला गाणी म्हणण्यात रस होता आणि तीसुद्धा त्याचा देव असलेल्या सैगलच्या ढंगात.

अभिनेता म्हणून किशोर पहिल्यांदा पडद्यावर आला तो १९५१ सालच्या फणी मुजुमदार यांच्या "आंदोलन" या सिनेमातून. पण पार्श्वगायक होण्याच्या नादात त्याचे अभिनयाकडे दुर्लक्ष होत होते. शेवटी एसडींनी त्याला त्यांच्या "फंटूश" सिनेमात गाण्याची संधी दिली आणि किशोरने त्याचे सोने केले. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एसडींनी त्याला सैगलच्या प्रभावातून बाहेर काढला आणि त्याचा स्वतःचा आवाज मिळवून दिला. किशोरला प्रतिसैगल व्हायचे होते पण तो किशोरकुमार झाला, हे आपले सुदैव. नाहीतर त्याचा दुसरा सी.एच. आत्मा झाला असता. त्यानंतर पार्श्वगायक आणि अभिनेता असा त्याचा समांतर प्रवास सुरु झाला.

नकला करण्याची उपजत कला आणि आवड असल्यामुळेच की काय, त्याचा कल विनोदी चित्रपट करण्याकडे अधिक होता, आणि किशोरकुमार म्हणजे विनोद असे समीकरण झाल्यामुळे त्याच्या काही सुंदर पण गंभीर चित्रपटांना लोकाश्रय लाभला नाही. कारण त्यांना उछलकूद करणारा किशोर हवा होता. नौकरी आणि मुसाफिर सारख्या दर्जेदार सिनेमांना त्याच्या इमेजचा तोटा सहन करावा लागला. तीच गत त्याच्या गाण्याविषयीची. गाण्याचे कुठलेही शास्त्रोक्त शिक्षण तसेच शास्त्रीय संगीताची बैठक नसल्याने अनेक संगीतकार त्याला गाण्याची संधी देण्यास धजावत नसत. नौकरी चित्रपटाच्या वेळेस संगीतकार सलील चौधरी त्याच्या आवाजात गाणे रेकॉर्ड करण्यास अनुत्सुक होतेे. मात्र नंतर त्याचा आवाज नीट ऐकून त्यांनी त्याला गाणे गाण्यास अनुकूलता दर्शवली. आधी हेमंतकुमार गाणार असलेले आणि नंतर किशोरने गायिलेले नौकरी मधले ते गाणे होते, छोटासा घर होगा बादलों की छांव में. याच सलीलदांनी मग हाफ टिकट मधे लताच्या गैरहजेरीत किशोरकडून स्त्रीपुरुष अशा दुहेरी आवाजात आके सीधी लगी दिलपे ऐसी कटरिया हे धमाल द्वंद्वगीत गाऊन घेतले.

किशोरकुमार हे एक अजब रसायन होते. आजच्या भाषेत सांगायचे तर तो मल्टीटास्किंग करण्यात तरबेज होता. अभिनय आणि पार्श्वगायनाव्यतिरिक्त लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन, संगीत दिग्दर्शन आणि चित्रपटनिर्मिती या कलात तो वाकबगार होता. त्याने निर्माण केलेले चित्रपटात आजही याची साक्ष देतात. मात्र इथेही पुन्हा एकदा पडद्यावरील त्याच्या प्रतिमेशी विसंगत असे गंभीर प्रकृतीचे सिनेमे त्यांने काढले आणि त्यांना म्हणावे तेवढे यश मिळाले नाही.

किशोर हा सचिन देवबर्मन यांचा मानसपुत्र होता. प्रत्येकवेळी नवनव्या संधी देत बर्मनदांनी त्याला गायनाच्या क्षेत्रात कार्यरत ठेवला. किशोरनेही त्यांनी दिलेल्या संधीचे सोने करत त्यांच्या चालींना आपल्या आवाजातून योग्य न्याय दिला. नवकेतन या देव आनंदच्या निर्मितीसंस्थेचे पान सचिनदांशिवाय हलत नसे. त्यामुळेच जिथे जिथे योग्य वाटेल तिथे सचिनदांनी नवकेतनच्या सिनेमात किशोरच्या आवाजाचा वापर केला आणि त्यामुळेच किशोर हा देव आनंदचा पडद्यावरचा आवाज बनला. पण बर्मनदा हे करड्या शिस्तीचे आणि अत्यंत व्यावसायिक संगीतकार होते. ज्या गाण्यांना किशोर न्याय देऊ शकणार नाही असे त्यांना वाटले ती त्यांनी रफीकडून गाऊन घेतली. यासंदर्भात गाईड सिनेमाचा उल्लेख करावा लागेल. देवचा आवाज असूनसुद्धा बर्मनदांनी गाईड संपूर्णपणे रफीकडून गाऊन घेतला. अपवाद म्हणून गाता रहे मेरा दिल हे लतासोबतचं द्वंद्वगीत किशोरच्या वाट्याला आलं होतं. पण त्यातही छोटे बर्मन उर्फ पंचमचा हात होता. गाईडच्या गाता रहे मेरा दिल ची चाल पंचमने तयार केली होती आणि अर्थातच ती गाण्यासाठी त्याला त्याचा लाडका मित्र किशोरच हवा होता. तीच गोष्ट आराधनाच्या वेळी झाली. अनेक ऐकीव आणि लिखित गोष्टींनुसार आराधनाच्या रुप तेरा मस्ताना प्यार मेरा दिवाना ची चाल पंचमने तयार केली होती आणि ती त्याने किशोरकडून आग्रहाने गाऊन घेतली. अजून काहींच्या मते, रफी हजयात्रेला गेल्याचे निमित्त साधून पंचमने, कोरा कागज था ये मन मेरा आणि मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू ही दोन गाणीही किशोरच्या आवाजात ध्वनिमुद्रित करुन टाकली. सचिनदा त्याकाळात आजारी असल्यामुळे त्यांचा सहाय्यक असलेल्या पंचमवर आराधनाच्या चालींवर गाणी ध्वनिमुद्रित करण्याची जबाबदारी होती आणि त्यावेळी त्याने किशोरला दिलेल्या त्या तीन गाण्यांनी किशोरकुमारचे नशीब बदलून टाकले. अर्थात याचा सर्वात मोठा फटका बसला तो महंमद रफीला. पुढच्या काही वर्षात किशोरने रफीचे साम्राज्य खालसा केले आणि लोकप्रियतेच्या लाटेवर तो आरुढ झाला.

त्याकाळच्या लोकप्रियतेच्या निकषांनुसार फिल्मफेअर पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहोर उमटवायला किशोरला आराधनाची वाट पाहावी लागली. गायन कारकीर्द सुरु केल्यापासून १८ वर्षांनी. त्याआधी इतकी वर्षे सुरेख आणि सुरेल गाणी गाऊनही पार्श्वगायनासाठी त्याला त्याचे पहिले फिल्मफेअर रुप तेरा मस्ताना साठी लाभले. पण त्यानंतर त्याची घौडदौड कुणीही रोखू शकले नाही. राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन या दोन सुपरस्टार्सच्या यशात त्यांच्या गाण्यांचा जो काही वाटा असेल त्याचे संपूर्ण श्रेय किशोरला जाते. विशेषतः राजेश खन्नाची रोमॅन्टिक नायकाची प्रतिमा किशोरच्या आवाजाने अजून लोकप्रिय केली. त्या काळात चित्रपटाची गीते हा त्यांचा अविभाज्य भाग होता आणि किशोर हा त्याचा अनभिषिक्त सम्राट होता. पुढे अमिताभने त्याच्या सिनेमातून गाण्यांचे महत्व कमी केले तरीही त्यावेळी सगळ्या नायकांचा प्रमुख आवाज किशोर होता. पुढे १९८५ सालच्या सागर पर्यंत त्याने आठ फिल्मफेअर पटकावले होते.

किशोरकुमारची गाणी हा त्याच्या भक्तांचा नेहमीच चर्चेचा विषय असतो. वेगवेगळ्या नायकांसाठी त्याचा विशेष ठेवणीतला आवाज होता. यॉडलिंग हा खास किशोरचा प्रांत. खरंतर त्याचा भाऊ अनुपकुमार हा टेक्स मॉर्टन आणि जिमी रॉजर्सची गाणी लावून यॉडलिंगचा सराव करीत असे. त्याला ते जमले नाही मात्र किशोरने ते अगदी सहज आत्मसात करुन हिंदी संगीतात एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. त्याच्या सगळ्या गाण्यांची जंत्री देणे इथे शक्य होणार नाही. मात्र वानगीदाखल त्याचे झुमरु मधले शीर्षकगीत हे एकच गाणे पुरेसे आहे.

किशोरकुमार हा एक मनस्वी कलावंत होता पण तितकेच त्याच्या विक्षिप्तपणाचे किस्से मशहूर आहेत. त्यांची चर्चा केल्याशिवाय त्याच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन पूर्ण होणार नाही. निर्मात्याने अर्धे पैसे दिले म्हणून अर्ध्याच चेह-यावर मेकअप करणारा किशोर, उगीच कारण नसताना निर्माता जी.पी.सिप्पीला मुंबईपासून मढ आयलंडपर्यंत गाडीचा पाठलाग करायला लावणारा किशोर, स्वतःच्याच घराच्या दारावर किशोरपासून सावधान (Beware of Kishore) अशी पाटी लावणारा किशोर, मुंबईत शूट चालू असताना केवळ दिग्दर्शकाने कट् म्हटले नाही म्हणून ती गाडी चालवत चालवत खंडाळ्यापर्यंत जाणारा किशोर ही त्याची विक्षिप्त रुपे. पण तितकाच तो सह्रदयही होता. अडचणीत पैसे नसलेल्या अनेकांसाठी त्याने विनामोबदला गाणी म्हटली. राजेश खन्ना आणि डॅनी डॅन्ग्झोप्पा या मित्रांच्या होम प्रॉडक्शन सिनेमात ते पैसे द्यायला तयार असूनसुद्धा फुकट गाणी गायली. अभिनेता दिग्दर्शक बिपीन गुप्ताला त्याचा दाल में काला हा सिनेमा पूर्ण करण्यासाठी १९६४ साली वीस हजार रुपये देणारा किशोरच होता. आणीबाणीच्या काळात संजय गांधीच्या प्रचारासाठी गाणे गायले नाही म्हणून कॉंग्रेसने किशोरची गाणी विविधभारती आणि दूरदर्शनवर लावण्यास बंदी घातली होती. एका चित्रपटाची ऑफर घेऊन किशोरकुमारच्या घरी गेलेल्या एका दिग्गज दिग्दर्शकाला किशोरने अनवधनाने आपल्या चौकीदारामार्फत गेटवरुनच परत पाठवले होते. अपमानित झालेल्या त्या सज्जन दिग्दर्शकाने किशोरचा विचार मनातून काढून टाकला आणि ती भूमिका राजेश खन्नाला दिली. तो दिग्दर्शक होता "ह्रषिकेश मुखर्जी" आणि तो चित्रपट होता "आनंद"

तर असा हा आपला सर्वांचा लाडका किशोर. त्याला जाऊन आज २९ वर्षे झाली तरी त्याच्या गीतांमधून तो सदैव आपल्यात आहे. आपल्या प्रिय किशोरदाला ही भावपूर्ण श्रद्धांजली.

🙏🏼

©पराग खोत
१३ ऑक्टोबर २०१६

No comments:

Post a Comment